पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज महत्त्वाचे वळण मिळाले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन महाजन यांच्याकडे सुपूर्द केले. यानंतर गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेनंतर रोहित पवार यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, 22 जूनपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, अशी हमी मिळाल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. आता 22 जूनपूर्वी मुख्यमंत्री आणि रोहित पवार यांच्यात बैठक होणार असून, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गिरीश महाजन यांच्या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी सांगितले की, 22 जूनपासून विधानमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी सरकारसोबत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ३० जूनपासून कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याने त्याआधी आवश्यक बदल करण्यासाठी सरकारकडे अद्याप वेळ आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या चर्चेसाठी विविध शेतकरी आणि विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, ठाकरे गटाचे नेते, जयंत पाटील तसेच महादेव जानकर यांचा समावेश असेल. सर्व शेतकरी नेत्यांसमवेत सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांच्या भेटीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळेच सरकारला वेळोवेळी कर्जमाफी द्यावी लागते, असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावरही सरकार गंभीरपणे काम करत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने बैठक बोलावली असून, चर्चेतून निश्चितच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रोहित पवार यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही गिरीश महाजन यांनी यावेळी केली.