Rohit Pawar: मरीन ड्राईव्हनंतर बारामतीतही हायव्होल्टेज घडामोड! अजितदादांच्या अपघाती निधनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ? वाचा काय घडलं

अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीसाठी FIR नोंदवण्याच्या मागणीवरून बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवार आणि समर्थकांनी आंदोलन केले.

Rohit Pawar: मरीन ड्राईव्हनंतर बारामतीतही हायव्होल्टेज घडामोड! अजितदादांच्या अपघाती निधनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ? वाचा काय घडलं

बारामती: राजकारणाचे केंद्र असलेल्या बारामतीत आज राजकीय संघर्षापेक्षा कायदेशीर संघर्षाची ठिणगी पडली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सावट अद्याप कायम असतानाच, या प्रकरणातील चौकशीच्या मागणीवरून बारामती पोलीस स्टेशनमध्ये आज हायव्होल्टेज घडामोडी पाहायला मिळाल्या. आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार यांनी समर्थकांसह पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने आणि पोलिसांसोबत झालेल्या जोरदार वादावादीने बारामतीचे वातावरण कमालीचे तापले आहे. ‘न्याय मिळेपर्यंत हटणार नाही’, अशी आक्रमक भूमिका पवार कुटुंबीयांनी घेतल्याने तणावात भर पडली आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा तपास सध्या सीबीआय (CBI) करत आहे. मात्र, या प्रकरणात संबंधित विमान कंपनी (VSR) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्यावर स्थानिक पोलीस स्तरावर गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

गेल्या दीड तासांपासून अधिक काळ रोहित पवार आणि पोलीस प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असून, पोलिसांनी तांत्रिक कारणास्तव एफआयआर (FIR) नोंदवण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला आहे. काल मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या राड्यानंतर आज पुन्हा बारामतीतही तोच कित्ता गिरवला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा; सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, नेमका काय आहे विषय?

या संपूर्ण प्रकरणामागे काहीतरी ‘काळेबेरे’ असल्याचा संशय आता समर्थकांमध्ये बळावू लागला आहे. माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार यांनी थेट सवाल उपस्थित केला की, “जर तपास पारदर्शक आहे, तर माहिती देण्यास टाळाटाळ का केली जातेय? जनतेच्या मनात शंकाकुशंकांचे डोंगर उभे राहिले असून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.” तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी अत्यंत भावूक पण ठाम शब्दात सांगितले की, “दादांना न्याय मिळणे हाच आमचा एकमेव हेतू आहे. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय गप्प बसणार नाही.”

पोलीस ठाण्याबाहेर बारामतीकरांची अभूतपूर्व गर्दी जमली असून, “न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. रोहित पवार यांनी स्वतः कायदेशीर बारकावे मांडत पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, तरीही एफआयआर घेतला जात नाही, हे अनाकलनीय आहे,” असे वकिलांच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तांत्रिकदृष्ट्या तपास सीबीआयकडे असल्याने स्थानिक पोलीस हात झटकत असल्याची चिन्हे आहेत, मात्र पवारांनी लावलेला हा तगादा पोलिसांची कोंडी करणारा ठरत आहे.

एकूणच, बारामतीची ही लढाई आता केवळ पोलीस स्टेशनपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती जनभावनेचा उद्रेक बनत चालली आहे. सुमारे दीड तास उलटूनही रोहित पवार पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. विमान कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला का, की यामागे आणखी काही गूढ आहे, हे सत्य शोधण्यासाठी आता पवारांनी रस्त्यावरची लढाई कायदेशीर मार्गाने लढण्यास सुरुवात केली आहे. पोलीस नमते घेऊन गुन्हा दाखल करणार की हा संघर्ष आणखी पेटणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde : ‘VSR विमानात बसणार नाही…’, शिवसेनेच्या नेत्यांचा मोठा निर्णय, नेमकं कारण तरी काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number