पनेवल २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई – गोवा महामार्गाप्रश्नी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मनसेने काही ठिकाणी तोडफोड केली. यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एका पत्राच्या माध्यमातून मनसेला जाब विचारला आहे. कुठला सैनिक आपल्या देशाच्या आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करतो?, असा संतप्त सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रातून विचारला आहे.
“दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला तर विध्वंस होतो. याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई – गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरू आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.”, अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
पत्रात पुढे रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं की, “जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.”
“मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल. याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे.”, अशा शब्दात पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसेला संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.