चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजपाचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपुरातील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ साईनाथ बुटके आणि त्याच्या पत्नीवर मारहाण केल्याप्रकरणी कीर्तीकुमार भांगडीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने कीर्तीकुमार भांगडीया यांच्यावर तक्रार दाखल केली असता त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ बुटके आणि पीडित महिला हे चिमूर येथे राहतात. साईनाथ बुटके यांचे मोठे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आहेत. किर्तीकुमार भांगडिया हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह बुटके यांच्या घराबाहेर आले. बुटके यांना शिवीगाळ करत त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. तसेच कार्यकर्त्यांनी बुटके यांच्या दोन्ही लहान मुलांवरही हात उचलला. माहिती मिळताच, गजानन बुटके हे त्यांच्या घरी पोहचले. त्यामुळे याप्रकरणी पीडितांनी केलेल्या तक्रारीनुसार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यासह कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.