एका व्हायरल व्हिडिओमुळे ग्लॅमरच्या जगात नावाजल्या गेलेल्या रानू मंडल यांच्यावर पुन्हा पूर्वीचीच वेळ आली असल्याचं सांगण्यात येतंय. पश्चिम बंगालमध्ये एका स्टेशनवर ‘इक प्यार का नग़मा है’ हे मधूर आवाजात गायलेल्या रानू मंडल यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
रानू मंडल यांच्या गायनप्रतिभेवर लुब्ध होऊन बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया यांनी आपल्या ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ या सिनेमासाठी खास रानू मंडल यांच्याकडून ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गाऊन घेतलं. या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा व्हिडिओदेखील खूप व्हायरल झाला होता. यावेळी हिमेश रेशमिया यांनी रानू मंडल यांना संधी दिल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तर काहींनी रानू मंडल यांच्या गाण्याला लता मंगशकर यांची भ्रष्ट नक्कल म्हणत नाकं मुरडली. मात्र त्या गाण्याचं साडे सहा लाख रुपये एवढं तगडं मानधन रानू मंडल यांना दिलं गेल्याची चर्चा होती. या नंतरही त्यांनी 4-5 गाण्यांचं रेकॉर्डिंग केलं होतं.
मात्र व्हायरल व्हिडिओमुळे गाजलेल्या रानू मंडल यांना दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओचा फटका बसला आणि त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या प्रसिद्धीत अचानक घट झाली.
काही दिवसांपूर्वी रानू मंडलकडे एका चाहतीने सेल्फी काढण्याची विनंती केली असता त्यांनी चाहतीला फटकारलं होतं. या घटनेचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपण सेलिब्रिटी असून आपल्यापासून दूर राहवं, अशा अर्थाचं वाक्य त्यांनी चाहतीला ऐकवल्याचंही त्या व्हायरल व्हिडिओचं समजत होतं. अनेक समारंभांत त्यांनी पत्रकारांची हेटाळणी केली होती. याशिवाय गानकोकिला लता मंगेशकर आणि आशा भोसले या दिग्गज गायिकांबद्दलही त्यांनी केलेल्या कमेंट्स लोकांना रुचल्या नव्हत्या. प्रसिद्धी मिळताच वादग्रस्त ठरू लागलेल्या रानू मंडल यांना अखेर या वादांचा फटका बसला. त्यांना ज्या गतीने स्टारडम मिळालं होतं, त्याच गतीने त्यांची प्रसिद्धी ओसरून गेल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्यापासून दुरावलेली त्यांची कन्यादेखील आईला भेटली. ही कन्या आईच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि तिची संपत्ती पाहूनच परत आल्याचीही टीका तेव्हा नेटकऱ्यांनी केली होती.
प्रसिद्धीनंतर त्यांच्या उद्धटपणामुळे पुढील संगीतकारांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना नंतर कोणतंही काम मिळालं नाही. जुन्या घरातून मुंबईत नव्या घरी राहायला आलेल्या रानू मंडल या आता काहीही काम मिळत नसल्यामुळे अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांच्यावर पुन्हा स्टेशनवर गायची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोष्टींमुळे वैतागलेल्या रानू मंडल आता पत्रकारांशी बोलणं टाळत आहेत.