‘शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच’, अशी भूमिका आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्य यांच्या खार परिसरातील घराबाहेर उभे असलेल्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतले आहे. शुक्रवारी रात्रीपासून शिवसैनिक याठिकाणी ठाण मांडून बसले होते. मात्र, राणा दाम्पत्य घरातून बाहेर पडणार अशी कुणकुण लागताच शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले.
पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या इमारतीकडे जाणारा रस्ता बॅरिकेडस लावून बंद केला होता. मात्र, काहीवेळ पूर्वीच शिवसैनिक या बॅरिकेडसवर चढले आणि राणा दाम्पत्याच्या घराच्या दिशेने चाल करून गेले. शिवसैनिकांचा मोठा जमाव पोलिसांचा वेढा तोडून राणा दाम्पत्याच्या इमारतीच्या बाहेर पोहोचले. याठिकाणी जमून शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली.
सकाळपासून शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, खार येथील प्रत्येक गाडी शिवसैनिकांकडून तपासली जात आहे. शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानाला पूर्णपणे घेराव घातला आहे. तसेच राणा दाम्पत्य हे कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर पोहचू नये, यासाठी शिवसैनिकांनी राणा यांच्या घराबाहेर चहूबाजूंनी वेढा घातला आहे.
खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसेनेच्यावतीने राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका तैनात केली आहे. यावर ‘बंटी-बबली’साठी राखीव असे पोस्टरही चिकटवलेत. दोघानांही महाप्रसाद दिल्यास त्यांना या रुग्णवाहिकेमधून थेट अमरावतीला मोफत सेवा देणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे, युवा सेना कोअर कमिटी सदस्य राहुल कनाल यांनी सांगितले. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासाठी शिवसेनेने दोन स्ट्रेचरसुद्धा आणली आहेत.