आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
पुढे ते म्हणाले, ‘बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही’.