ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर परप्रांतीय ओला चालकाने किरकोळ कारणावरून थेट एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वृद्ध व्यक्ती आणि ओला चालक यांच्यात वाद झाला.
त्यानंतर ओला चालकाने थेट त्या वृद्ध व्यक्तीला धक्का दिला, त्याच्या कानात लगावली आणि थेट जमिनीवर पाडले. तो ओला चालक फक्त तितक्यावरच थांबला नाही तर तो वृद्ध व्यक्ती जमिनीवरही पडल्यानंतरही तो त्याला मारत होता. यामध्ये तो वृद्ध व्यक्ती जबर जखमी झाला आहे.
यादरम्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना या प्रकरणात कारवाई करण्याबाबत फोन केला. या ओला चालकावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत होती. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीला फोनवरून संवाद साधला.
अविनाश जाधव यांनी वृद्ध व्यक्ती आणि राज ठाकरेंचा संवाद करून दिला. ठाण्यातील प्रकरणात मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक भूमिका घेत आहेत. यादरम्यानच आता थेट राज ठाकरे यांनी मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीसोबत संवाद साधला आहे.