मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ED कार्यालयात हजर राहणार आहेत. सकाळी 10.30 च्या सुमारास ते शिवाजी पार्क येथील आपल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानावरून निघाले. यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे. पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी हे सर्वजण राज यांच्या सोबत निघाले.
राज ठाकरे आपल्या लकी नंबर असलेल्या 9 नंबर च्या लँड क्रूझर गाडी ने रवाना झाले.
पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे हे मागच्या गाडी ने रवाना होत आहेत.
राज ठाकरे यांच्या आई त्यांना गाडी कडे सोडण्यासाठी आल्या होत्या.
राज ठाकरे यांची कोहिनूर प्रकरणी ED कडून चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येत होतं. आधी ED कार्यालयाच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र बंद ठेवण्याचं आवाहन मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं होतं. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी तसं न करण्याची सूचना दिली. शांततापूर्ण आंदोलन करण्याचाही मार्ग विचारात घेतला होता. मात्र त्यालाही ठाकरे यांनी नकार देत सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.
थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष ED च्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचणार आहेत.
कुठल्याही स्वरूपाचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करत कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे.
मनसे नेता संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि रवी मोरे यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.