Raj -Udhhav Thackeray Interview: ‘दररोज 56 गाड्या उत्तरेतून महाराष्ट्रात येतात…ते आपापले मतदारसंघ बनवतायंत’; राज ठाकरेंनी सांगितला परप्रांतियांचा ‘प्लॅन’

परप्रांतीयांच्या वाढत्या स्थलांतरामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक समतोल धोक्यात असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

Raj -Udhhav Thackeray Interview: ‘दररोज 56 गाड्या उत्तरेतून महाराष्ट्रात येतात…ते आपापले मतदारसंघ बनवतायंत’; राज ठाकरेंनी सांगितला परप्रांतियांचा ‘प्लॅन’

मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश  मांजरेकर यांनी एकत्र येत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची परखड व स्पष्टवक्ती मुलाखत घेतली आहे. या विशेष मुलाखतीत मुंबई, महाराष्ट्र, मराठी अस्मिता, आगामी निवडणुका आणि भविष्यातील राजकीय दिशा यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी थेट आणि रोखठोक भूमिका मांडली असून, या संवादाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची स्थापना ज्या उद्देशाने झाली, तो उद्देश आजही तितकाच जिवंत आहे, असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केले. हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी उभा केलेला लढा आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. परप्रांतीयांचे वाढते लोंढे आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय, सामाजिक स्थिती यावर राज ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले की, उत्तरेकडून दररोज सुमारे 56 रेल्वे गाड्या महाराष्ट्रात भरून येतात आणि त्या रिकाम्या परत जातात. याचा अर्थ उत्तर भारतीयांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर महाराष्ट्रात होत आहे. ठाणे जिल्ह्यातच आठ ते नऊ महानगरपालिका आहेत, तर इतर राज्यांमध्ये एका जिल्ह्यात जेमतेम एक किंवा दोन महानगरपालिका असतात. यावरून महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांचे प्रमाण किती वाढले आहे, हे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

नुसते परप्रांतीयांचे प्रमाण वाढत नाही, तर त्यांची दादागिरीही वाढत असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, महानगरपालिकेचा महापौर हिंदी असणार, उत्तर भारतीय असणार, अशी विधाने खुलेआम केली जात आहेत. बाहेरून येणारे लोक केवळ रोजीरोटीसाठी येत नाहीत, तर आपले स्वतंत्र मतदारसंघ तयार करून महाराष्ट्रावर सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने येथे स्थायिक होत आहेत, हे आपण आधीपासून सांगत आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज प्रत्यक्षात तेच चित्र दिसत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: Budget 2026-27 : यंदाच्या अर्थसंकल्पाच्या तारीखेचा सस्पेन्स संपला! ‘या’ दिवशी होणार यंदा बजेट सादर

मुंबईत सत्ता स्थापन करण्याचे परप्रांतीयांचे जुने स्वप्न असून, त्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातही हिंदी भाषिकांचे वर्चस्व आहे, राज्यातही परप्रांतीय सत्तेत आले आहेत. आता जर महानगरपालिकांमध्येही हेच चित्र दिसू लागले, तर परिस्थिती अत्यंत कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला. हे सर्व घडत असताना गप्प बसून हतबलपणे पाहणे आम्हाला शक्य नाही, आणि म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत, असे राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, याच विषयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ दिला. मराठी माणूस आजही पेटलेला दिसतो का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाने मिळवून दिले आहेत. 1960 ते 1966 या काळात मराठी माणूस खचला होता, आत्मविश्वास गमावला होता. त्या मराठी माणसामध्ये ताकद भरण्यासाठीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पक्षांतर्गत मतभेद होणे ही सामान्य बाब आहे. मात्र एखादा पक्ष फोडणे, त्याचे चिन्ह बदलणे, हे फार मोठे षड्यंत्र आहे. तरीही एखादा पक्ष पूर्णपणे संपवणे ही अत्यंत मोठी गोष्ट आहे, आणि शिवसेना अशी सहज संपणारी नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी अस्मिता, मराठी माणसाचे हक्क आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हा लढा पुढेही सुरूच राहील, असा स्पष्ट संदेश या भूमिकेतून देण्यात आला आहे.

हेही वाचा: Thackeray Brother Interview : ‘शाळेबाहेरील पानटपऱ्यांपर्यंत ड्रग्ज पोहोचलंय, हे गंभीर आहे’; सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर राज-उद्धव बरसले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number