पुणे दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर तोफ डागली आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी अदानींच्या साम्राज्य विस्तारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, देशाला भविष्यात एकाधिकारशाहीचा मोठा धोका असल्याचे मत मांडले. राज ठाकरेंच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 'अदानी' केंद्रस्थानी आले आहेत.
दुसऱ्यांचे व्यवसाय 'गन पॉईंट'वर खेचले? ठाकरेंचा खळबळजनक आरोप
राज ठाकरे यांनी यावेळी टाटा आणि अंबानींसारख्या उद्योगपतींचे उदाहरण देत अदानींच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. "टाटा आणि अंबानींनी आपले उद्योग स्वतःच्या कष्टाने उभे केले आहेत, पण अदानींनी गेल्या 10 वर्षांत जे काही मिळवले, ते दुसऱ्यांच्या व्यवसायांवर कब्जा मारून मिळवले आहे," अशी टीका त्यांनी केली. केंद्राने अदानींना सात ते आठ विमानतळ बहाल केले, पण त्यातील नवी मुंबई विमानतळ वगळता एकही अदानींनी बांधलेले नाही. पोर्ट्सच्या बाबतीतही मुंद्रा पोर्ट वगळता इतर सर्व बंदरे अदानींनी दुसऱ्यांकडून 'गन पॉईंट'वर किंवा दबावाखाली घेतली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
सिमेंट ते पॉवर: एकाधिकारशाहीचा धोका
सिमेंट उद्योगाचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले की, अदानी या व्यवसायात कधीच नव्हते. मात्र, अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट यांसारख्या कंपन्या विकत घेऊन ते अचानक देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. हा विषय केवळ उद्योगाच्या वाढीचा नाही, तर ती वाढ 'कशी' होतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर एकाच माणसाकडे देशातील सर्व महत्त्वाची संसाधने (विमानतळ, बंदरे, वीज, सिमेंट) एकवटली, तर उद्या ते संपूर्ण देशाला वेठीस धरू शकतात. इंडिगो कंपनीने जसे प्रवाशांना वेठीस धरले होते, तशीच परिस्थिती संपूर्ण देशावर ओढवू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबई आणि धारावीवर डोळा
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू (राज आणि उद्धव ठाकरे) अदानींच्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसत आहेत. "भाजपला मुंबई आणि परिसर अदानींच्या घशात घालायचा आहे," असा आरोप त्यांनी संयुक्तपणे केला आहे. विशेषतः धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील मोक्याच्या जमिनी एका उद्योगपतीला दिल्या जात असल्याचा दावा करत, त्यांनी याला मुंबईच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे संबोधले.
"मुख्यमंत्र्यांना समजलंय, पण सांगणार कोणाला?"
शेवटी, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टिप्पणी करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. अदानींच्या या वाढत्या प्रभावाचा धोका मुख्यमंत्र्यांनाही कदाचित समजत असेल, पण "त्यांना हे समजलं असलं तरी ते सांगणार कोणाला?" असा सवाल करत त्यांनी सत्तेतील हतबलतेवर बोट ठेवले. पुण्याचा राज ठाकरेंचा हा दौरा आणि त्यांची अदानींवरील ही आक्रमक भूमिका आगामी निवडणुकीत गेमचेंजर ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.