काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात, आज त्यांच्या विषयी आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नावं सारखीच का आहेत? सगळ्या चोरांचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं. या विधानामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.
त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभेतील सदस्यत्वही गेले.
या पार्श्वभूमीवर मोदी आडनावा संदर्भात मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात पुढे काय समोर येते याकडे देशाचे लक्ष लागून आहे.