दिल्लीत 20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कथित बळाच्या वापरावरून राजकारण पुन्हा तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सविस्तर पत्र लिहित या संपूर्ण कारवाईबाबत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
25 जुलै 2026 रोजी पाठवलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी नमूद केले की, विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्वाची मागणी करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. अशा परिस्थितीत संवाद साधण्याऐवजी सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान अश्रुधूरासह अन्य बळाचा वापर करण्यात आल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी जखमी झाल्याचा दावाही त्यांनी पत्रात केला आहे. महिला विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचाही गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. काही विद्यार्थिनींना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली असून त्यांच्या खासगी अवयवांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे आरोप विविध अहवालांमध्ये समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
साध्या वेशातील व्यक्ती कोण?
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काही व्यक्ती साद्या कपड्यांत दिसल्याचे अनेक व्हिडिओ समोर आल्याचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या व्यक्ती पोलीस कर्मचारी होते की इतर कोणी, तसेच त्यांची नियुक्ती कोणाच्या आदेशावर करण्यात आली होती, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने या घटनेची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पेलेट गनच्या वापरावर थेट प्रश्न
पत्रातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे पेलेट गनच्या कथित वापराबाबत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला सवाल. विविध वृत्तांमध्ये आणि सोशल मीडियावरील माहितीनुसार या कारवाईत अनेक जण गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी 19 वर्षीय विद्यार्थी साहिल लोछाब याची भेट घेतल्याचेही पत्रात म्हटले आहे. पेलेट गन लागल्यानंतर साहिलला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका असल्याचा दावा त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अमित शहा यांना थेट प्रश्न विचारला की, विद्यार्थ्यांविरोधात पेलेट गन आणि अन्य घातक बळाचा वापर करण्यास गृहमंत्रालयाने मंजुरी दिली होती का? तसे नसल्यास अशा कारवाईचे आदेश नेमके कोणत्या अधिकाऱ्याने दिले, याची माहिती सरकारने द्यावी.