सध्या लोकसभेचं कामकाज सुरू आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाचा मुद्दा चांगलाच जोर धरून आहे. आज चार वाजता याबाबत निर्णय होणार आहे. दरम्याने आज राहुल गांधी यांनी संसदेत आपले मत मांडले आहे. यावेळी 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाच्या मुद्द्यासहित नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही भाष्य केले आहे .
राहुल गांधी म्हणाले की, भाजपला माहित होते की हे विधेयक प्रत्यक्षात मंजूर होऊ शकत नाही. ही एक घाईघाईत उचललेली चाल होती, कारण पंतप्रधानांना कोणत्याही परिस्थितीत दोन संदेश द्यायचे होते. पहिले म्हणजे, त्यांना भारताचा निवडणूक नकाशा बदलायचा होता आणि दुसरे म्हणजे, त्यांना महिलांना असलेला आपला पाठिंबा पुन्हा एकदा जाहीर करायचा होता. ते हे का करत आहेत, हे मी तुमच्या कल्पनाशक्तीवर सोडतो, पण सत्तेत असलेल्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की ते असे का करत आहेत. सत्य हे आहे की जादूगार पकडला गेला आहे. बालाकोटचा जादूगार, नोटाबंदीचा जादूगार, सिंदूरचा जादूगार अचानक पकडला गेला आहे.
सभागृहातील चर्चेदरम्यान 'जादूगार' या शब्दाच्या वारंवार वापरामुळे गदारोळ झाला. यासाठी अध्यक्षांनी राहुल गांधींना फटकारलेसुद्धा. राहुल यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अनेक वेळा विरोध केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांचे भाषण सभागृहातून काढून टाकण्याची मागणी केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांनी माफी मागावी असे म्हटले. या गदारोळात, अध्यक्ष ओम बिरला यांनी खासदारांना संसदीय भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले.