पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याचा अंतिम निकाल आज, शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. गुरुवारी दोन्ही शहरांमध्ये काही किरकोळ वाद, शाई पुसण्याचे प्रकार आणि बोगस मतदानाच्या तक्रारी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पुण्यात 41 प्रभागांतील 165 जागांसाठी तर पिंपरी-चिंचवडमध्ये 32 प्रभागांतील 128 जागांसाठी मतदान झाले. सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत मतदारांचा उत्साह संमिश्र पाहायला मिळाला. प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, पुण्यात 54.50 टक्के तर पिंपरीत सुमारे 60 टक्के मतदान झाले असून, आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत.
सकाळच्या सत्रात ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का चांगला राहिला. मात्र, दुपारच्या वेळी काही केंद्रांवर मतदान प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र होते. अखेरच्या दीड तासात, विशेषतः झोपडपट्टीबहुल आणि दाट लोकवस्तीच्या भागांत मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. मतदानाच्या या टक्केवारीवरून दोन्ही शहरांतील प्रस्थापित कारभारी आपली सत्ता राखणार की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या वेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विस्कळीत झालेली राजकीय समीकरणे. राज्यात महायुतीत एकत्र असलेले भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) काही ठिकाणी स्वतंत्र तर कुठे नव्या मित्र पक्षाला सोबत घेत रिंगणात उतरले होते. पुण्यात भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत युती केली, तर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) काही ठिकाणी ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार’ पक्षासोबत अनपेक्षितरीत्या हातमिळवणी केल्याने मतदारांमध्येही संभ्रम पाहायला मिळाला. दुसरीकडे, काँग्रेसने शिवसेना (उबाठा) आणि मनसेला सोबत घेऊन एक वेगळीच चूल मांडली होती.
निवडणुकीच्या प्रचारात पुणे आणि पिंपरीमधील प्रलंबित विकासकामे, मेट्रोचे जाळे आणि कथित भ्रष्टाचार हे मुद्दे कळीचे ठरले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला आरोप-प्रत्यारोपांचा ‘कलगीतुरा’ मतदारांना आकर्षित करण्यात किती यशस्वी ठरला, हे आज स्पष्ट होईल. प्रशासकीय स्तरावर मतमोजणीसाठी शहरात विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतमोजणीची सुरुवात शुक्रवारी सकाळी 10 वाजता टपाली मतांच्या मोजणीने होईल. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील (EVM) मतांची मोजणी सुरू केली जाणार आहे. विविध प्रभागांतील मतदानाची व्याप्ती लक्षात घेता 12 ते 20 फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार, मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्या तीन तासांत, म्हणजेच दुपारी एक वाजेपर्यंत पहिला अधिकृत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरांचे आगामी पाच वर्षांचे भवितव्य ठरवणारा हा शुक्रवार राजकीय पक्षांसाठी खऱ्या अर्थाने ‘अग्निपरीक्षा’ ठरणार आहे.