मुंबई: महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांचा वारसा लाभला आहे, जिथे महिलांच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले जाते. मात्र, आज याच राज्यात चिमुरड्या लेकी सुरक्षित नसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका अवघ्या 4 वर्षांच्या कळीला उमलण्याआधीच एका नराधमाने खुडले. या घटनेने केवळ पुणे जिल्हाच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय आरोपीला अटक केली असली, तरी या क्रूर कृत्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्दांच्या फैरी झाडल्या आहेत. "राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद आल्यापासून महिलांवरील अत्याचार, हत्या आणि कायदा सुव्यवस्थेचे पूर्ण वाटोळे झाले आहे," असा घणाघात राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केला. गृहमंत्री म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याऐवजी मुख्यमंत्री इतर राज्यांमध्ये प्रचारात मग्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री 24 तास राजकारणात अडकल्यामुळे राज्याची परिस्थिती गंभीर बनली आहे, अशी टीका त्यांनी केली.
राऊत यांनी सरकारवर शरसंधान साधताना 'लाडकी बहीण' योजनेचाही अत्यंत कठोर शब्दांत समाचार घेतला. "ज्या दुर्दैवी मुलीवर हा अन्याय झाला, तिची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात फडणवीस 1500 रुपये टाकत असतील, पण त्या रुपयांच्या बदल्यात तिच्या लेकीवर अत्याचार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला का?" असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला. 1500 रुपये देऊन बहिणींचे तोंड बंद करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत त्यांनी या सरकारविरुद्ध माता-भगिनींनी बंड पुकारण्याचे आवाहन केले आहे.
काल झालेल्या 'मिसिंग लिंक' रस्त्याच्या उद्घाटनावेळी वाहतूक कोंडीमुळे मुख्यमंत्र्यांनी लोकांची माफी मागितली होती. त्यावर बोट ठेवत राऊत म्हणाले की, "वाहतूक कोंडीबद्दल माफी मागणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचाराबद्दल आणि त्यांच्या अपयशाबद्दल एकदा तरी माफी मागितली आहे का?" राज्यातील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करताना नराधमांना कायद्याचा धाक उरलेला नाही. याला पूर्णपणे राज्य सरकार आणि गृहमंत्री जबाबदार असल्याचे राऊतांनी ठासून सांगितले.
या घटनेनंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचाही राऊतांनी निषेध केला. "ज्यांचा कोणताही दोष नाही, अशा सामान्य जनतेवर तुम्ही लाठीचार्ज करत आहात. ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन न्यायासाठी रस्त्यावर उतरले होते," असे सांगत राऊत यांनी संताप व्यक्त केला. पोलीस दलाचा वापर केवळ राजकीय सुरक्षेसाठी केला जात असून हे सरकार 'नालायक' असल्याची टोकाची टीका त्यांनी केली. या प्रकरणी खऱ्या अर्थाने सरकारवरच खटला दाखल व्हायला पाहिजे, अशी आक्रमक मागणी करत त्यांनी राजकारण्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.
एकंदरीत, नसरापूरच्या या घटनेने महाराष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्तेच्या मस्तीत राज्य सुरू आहे अशी टीका आता विरोधकांकडून अधिक तीव्र झाली आहे. "हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेले नाही," ही राऊतांची खंत सामान्य जनतेच्या मनातही घर करत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आहे. आता या क्रूर गुन्ह्यातील आरोपीला जलद गतीने कठोर शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.