पुणे: पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत मतदानाला केवळ 24 तास उरलेले असताना, शहराच्या राजकारणात एका व्हिडीओने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आक्रमक नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील कथित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ या दाव्यावर जोरदार प्रहार केला आहे. या व्हिडीओमुळे ऐन मतदानाच्या तोंडावर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
धंगेकर यांनी थेट शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे नाव न घेता त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आणि चारित्र्यहीन व्यक्तींना पाठीशी घालण्याचे गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळे आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे. खरंतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार? ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत.”
धंगेकरांचा रोख प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 12 मधील भाजप उमेदवारावर आहे. त्यांनी पुढे असा दावा केला की, “प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो आणि या सगळ्या आर्थिक विषयातून कमावलेल्या पैशात बारबाळांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे.” या विधानामुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली असून विरोधकांनी या मुद्द्यावर रान उठवण्यास सुरुवात केली आहे.
केवळ स्थानिक नेत्यांवरच नव्हे, तर धंगेकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावरही निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना थेट सवाल विचारले आहेत. धंगेकर म्हणाले, “संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत. असो, ते भाजप आहे… या सर्व गोष्टीच त्यांना ‘पार्टी विथ डिफरन्स’ बनवतात.” या उपरोधिक टीकेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे.
खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत.
प्रभाग… pic.twitter.com/Mxu8PkYTHs — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) January 13, 2026
पुणे महापालिकेत 160 हून अधिक जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढत असल्याने चुरस आधीच वाढली होती. त्यातच शिवाजीनगर आणि कोथरूड पट्ट्यात या व्हिडीओचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा ‘लास्ट मिनिट गेम’ असल्याचा आरोप भाजप समर्थकांकडून केला जात असला, तरी या व्हिडीओमधील सत्यता आणि त्यावर येणारी नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
आता चेंडू भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या कोर्टात आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या ‘व्हिडीओ स्फोटा’चे पडसाद मतपेटीत उमटतात की पुणेकर या आरोपांना फेटाळून लावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. धंगेकरांच्या या पवित्र्यामुळे पुणे मनपाची ही निवडणूक केवळ विकासकामांवर आधारित न राहता आता ‘चारित्र्य’ आणि ‘नैतिकते’च्या मुद्द्यावर येऊन ठेपली आहे.