पुणे: सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, पुणे महानगरपालिकेची निवडणूक विशेष हाय व्होल्टेज ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जय महाराष्ट्र न्यूज’ सोबतच्या खास मुलाखतीत पुणेकरांसाठी दिलेल्या पाच शब्दांचा उल्लेख करत आगामी काळातील विकासाची दिशा स्पष्ट केली आहे.
अजित पवार म्हणाले की, पुणेकरांना मी पाच शब्द दिले आहेत. त्यातील पहिला शब्द म्हणजे खड्डेमुक्त पुणे शहर आणि वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवणे. दुसरा शब्द म्हणजे दररोज महानगरपालिकेच्या पाईपलाइनद्वारे पुणेकरांच्या घरात नियमित पाणीपुरवठा पोहोचवणे.
तिसरा शब्द आरोग्य क्षेत्राशी संबंधित असून, पुण्यात अत्याधुनिक सुविधा असलेली हायटेक रुग्णालये उभारून आरोग्य क्षेत्रात झालेले बदल पुणेकरांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौथा शब्द म्हणजे दररोज शहर स्वच्छ ठेवणे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नवीन प्रणाली पुणे महानगरपालिकेत राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाचवा महत्त्वाचा मुद्दा प्रदूषण कमी करण्यासंदर्भात असून, एसटीपी प्रकल्पांच्या माध्यमातून सध्या पुण्यातून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून मुळा, मुठा तसेच इतर नद्यांमध्ये सोडण्यावर भर दिला जाणार आहे. प्रदूषित पाणी थेट नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया केली जाईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे अजित पवार म्हणाले.
या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आमच्या वचननाम्यात आणि जाहीरनाम्यात करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच पुण्यातील जुने ऐतिहासिक वाडे व इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्विकास, तसेच स्लम भागांमध्ये टीडीआर आणि अन्य शासकीय योजनांचा प्रभावीपणे अवलंब करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच मुद्द्यांच्या आधारे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार केला जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती झालेली असून, यासंदर्भातील जाहीरनामा यापूर्वी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला होता.
दरम्यान, येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानानंतर पुण्यातील या हाय व्होल्टेज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, पुणेकरांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.