मुंबई-पुणे महामार्गावर आज अचानक वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली आहे. उंचीचा अंदाज न आल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा एक अवजड कंटेनर मोरवाडी परिसरातील ग्रेड सेपरेटरखाली अडकला आणि काही क्षणांतच संपूर्ण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
या घटनेमुळे सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही वेळातच पिंपरी–चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी याचा प्रवासी, कर्मचारी आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थींना त्रास झाला.
सदर घटनेनंतर, घटनेची माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली. मात्र सकाळी कामावर निघालेल्या अनेक नागरिकांना तब्बल तासाभरापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.दरम्यान, या घटनेमुळे मोरवाडी, पिंपरी, चिंचवड आणि आसपासच्या भागात अंतर्गत रस्त्यांवरही मोठी गर्दी झाली. यासंदर्भात अनेक वाहनचालकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत परिस्थितीची माहिती दिली.
वाहतूक पोलिसांचे आवाहन:
शक्य असल्यास जुना मुंबई–पुणे महामार्ग टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच अवजड वाहन चालकांनी ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल आणि अंडरपासची उंची तपासूनच प्रवास करावा, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.