पुणे: पुण्याच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील उपनगरांच्या विकासाला आता मेट्रोच्या गतीची 'पॉवर' मिळणार आहे. ट्रॅफिकच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पुणेकरांसाठी महामेट्रोने एक आशेचा किरण दाखवला असून, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील 4-बी आणि 4-सी या दोन महत्त्वाकांक्षी मार्गिकांच्या कामाला आता वेग आला आहे. केवळ कागदावर असलेले हे प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने सरकले असून, यामुळे हडपसर, फुरसुंगी आणि लोणी काळभोर परिसराचा कायापालट होणार आहे.
महामेट्रोने या दोन्ही मार्गिकांसाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली असून, त्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेसाठी 5 मार्च 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सल्लागार नेमल्यानंतर या प्रकल्पाच्या आराखड्याला आणि प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळणार आहे. पुण्याच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता, हे विस्तारीकरण म्हणजे शहराच्या दळणवळण व्यवस्थेतील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
मेट्रो मार्गिका 4-बी; हडपसर ते लोणी काळभोर
ही मार्गिका पूर्व पुण्याची 'लाईफलाईन' ठरणार आहे. विशेष म्हणजे, जमिनीची कमतरता आणि वाहतुकीची घनता लक्षात घेऊन येथे 'डबल डेकर' उड्डाणपुलाचा प्रयोग केला जाणार आहे. म्हणजे एकाच पिलरवर खाली वाहने धावतील आणि वरून मेट्रो सुस्साट जाईल.
प्रस्तावित स्थानके: हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी-हडपसर, लक्ष्मी कॉलनी, मांजरी फाटा, द्राक्ष बाग, टोल नाका, वाक वस्ती आणि लोणी काळभोर.
एकूण 10 स्थानके असलेल्या या मार्गामुळे सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमची निकालात निघण्याची शक्यता आहे.
मेट्रो मार्गिका 4-सी; हडपसर ते सासवड रस्ता
आयटी हब आणि रेल्वे स्थानकांना जोडण्यासाठी ही मार्गिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. साडेपाच किलोमीटरच्या या मार्गावरही 'डबल डेकर' तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते आणि मेट्रो यांचा मेळ घातला जाईल.
प्रस्तावित स्थानके: हडपसर ग्लायडिंग क्लब, फुरसुंगी आयटी पार्क, सुलभ उद्यान आणि सासवड रस्ता रेल्वे स्थानक.
फुरसुंगी येथील आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो तरुणांना या मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळेल, तसेच सासवड रेल्वे स्थानकापर्यंतची 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' यामुळे सुलभ होईल. पुण्याच्या या नव्या मेट्रो जाळ्यामुळे केवळ अंतर कमी होणार नाही, तर पर्यावरणापूरक प्रवासाचा एक नवा पर्याय उपलब्ध होईल. हडपसर आणि आसपासच्या परिसरातील घरांच्या किमती आणि रिअल इस्टेट क्षेत्रालाही या प्रकल्पामुळे मोठी उभारी मिळणार आहे. 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीला सार्थ ठरवत, आता पुणेकर लवकरच या हायटेक प्रवासाचा आनंद लुटतील, अशी चिन्हे दिसत आहेत. 5 मार्चनंतर या प्रकल्पाचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून प्रशासन आता 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहे.
हेही वाचा: Harshwardhan Sapkal : शिवरायांबद्दल ते वक्तव्य, वाद पेटला; सपकाळांकडून आता सारवासारव