पुणे: पुणेकरांच्या वाहतूक कोंडीच्या वनवासात 'मेट्रो' हा एक सुखद दिलासा ठरत असतानाच, आता या प्रवासाचा पुढचा थांबा थेट 'लोहगाव विमानतळ' असणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विमानतळापर्यंतच्या मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. वनाझ-रामवाडी मेट्रो मार्गिकेचा विस्तार करून ती कल्याणीनगरमार्गे विमानतळापर्यंत नेण्याचा सर्वात व्यवहार्य पर्याय निश्चित करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात विमानतळावर पोहोचण्यासाठी पुणेकरांना ना रिक्षाच्या 'मीटर'ची काळजी करावी लागेल, ना वाहतूक कोंडीत अडकण्याची भीती!
सहा पर्यायांतून कल्याणीनगरची सरशी
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या विशेष आढावा बैठकीत पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट करणारा निर्णय घेण्यात आला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सादरीकरण केलेल्या सहा विविध पर्यायांपैकी 'कल्याणीनगर स्पर लाईन'वर लोकप्रतिनिधींनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. हा मार्ग सिम्बायोसिस कॉलेजमार्गे थेट विमानतळानजीकच्या 'एरोमॉल'पर्यंत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गासाठी संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीतील जागा घेण्याची गरज भासणार नसल्याने तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत.
भूसंपादनाचा 'पेच' सुटला, गती मिळणार!
या नवीन मार्गिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अत्यंत कमी भूसंपादन करावे लागणार आहे. सध्याच्या रस्त्यांवरूनच मेट्रो नेण्यात येणार असल्याने कामाला वेग मिळणे सोपे होईल. महामेट्रो लवकरच याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार करून पुणे महापालिकेकडे सादर करणार आहे. "कमी वेळात आणि कमी खर्चात प्रवाशांची मोठी सोय" या सूत्रावर आधारित हा मार्ग पुण्याच्या पायाभूत सुविधेसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मेट्रोचे जाळे उपनगरांपर्यंत विस्तारणार
केवळ विमानतळच नाही, तर पुण्याच्या चहुबाजूंनी मेट्रोचे लोखंडी रूळ आता धावणार आहेत. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी या दोन महत्त्वपूर्ण विस्तारांचे कामही लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या सीमा विस्तारल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे ही आता निव्वळ चैन नसून काळाची गरज बनली आहे.
नवीन 'कनेक्टिव्हिटी'ची चाचपणी
पुण्याच्या वाहतुकीचा 'बॅकबोन' अधिक मजबूत करण्यासाठी शेवाळेवाडी (हडपसर) ते कात्रज आणि पुढे वाकड फाटा या दरम्यानच्या मेट्रो मार्गासाठी देखील नवीन 'डीपीआर' तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गाला समांतर पद्धतीने विकसित केल्या जाणाऱ्या या मार्गामुळे संपूर्ण उपनगरीय क्षेत्र मुख्य शहराशी वेगवान पद्धतीने जोडले जाईल. यामुळे पुण्याच्या आयटी हब आणि रहिवासी भागांमधील अंतर मेट्रोच्या वेगाने कापले जाणार आहे.
पुणेकरांसाठी मेट्रो केवळ एक वाहन नसून ती धावत्या पुण्याच्या प्रगतीची 'लाईफलाईन' ठरत आहे. विमानतळ थेट मेट्रोशी जोडले गेल्यास आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. आता प्रतीक्षा आहे ती या 'डीपीआर'ला अंतिम मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा होण्याची! पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी मेट्रो आता खऱ्या अर्थाने सज्ज झाली आहे.