पुणे: पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात होताच सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिवसेना-भाजप युतीचे सुतोवाच केले असले, तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर चित्र मात्र वेगळे दिसत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आक्रमक नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या जागावाटपाच्या धोरणावर उघड नाराजी व्यक्त केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
भाजपची 'ती' ऑफर आणि धंगेकरांचा संताप
जागावाटपाच्या चर्चेत भाजपकडून शिवसेनेला अशा जागांची ऑफर दिली जात आहे, जिथे कधीही भाजप किंवा शिवसेना निवडून आलेली नाही. यावरून रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "ज्या जागांवर कधी विजयच मिळाला नाही, त्या जागा घेऊन आम्ही काय करायचे?" असा थेट सवाल धंगेकरांनी उपस्थित केला आहे. भाजप केवळ जागावाटपाचा आकडा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेची बोळवण करत असल्याचा आरोप आता त्यांच्या गोटातून होत आहे.
'प्रणव धंगेकर अपक्ष लढणार?' घरचा आहेर की रणनीती?
या वादाचा सर्वात मोठा फटका रवींद्र धंगेकर यांच्या बालेकिल्ल्यात बसताना दिसत आहे. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर हे प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या कोंडीमुळे आपल्या कार्यकर्त्यांचा आणि कुटुंबाचा राजकीय सन्मान राखण्यासाठी धंगेकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. "जर आमच्या उमेदवारांचे भवितव्यही भाजपच ठरवणार असेल, तर कार्यकर्त्यांनी कोणासाठी लढायचे?" असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे
कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यानंतर धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. "अशा प्रकारची युती करणे पक्षासाठी घातक ठरेल," असा स्पष्ट इशारा धंगेकरांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. केवळ मैत्रीखातर निवडून न येणाऱ्या जागा लढवणे म्हणजे आत्मघात करण्यासारखे आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
पुण्यात नव्या समीकरणांची नांदी?
भाजपसोबतचा तिढा सुटत नसल्याचे पाहून आता धंगेकरांनी नव्या पर्यायांकडे लक्ष वळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेनेशी चर्चेसाठी उत्सुक असल्याचे सूत्रांकडून समजते. "पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून निर्णय घ्यावा, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे," असे म्हणत धंगेकरांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे.
रवींद्र धंगेकर यांची ही 'वेगळी भूमिका' केवळ दबावतंत्र आहे की पुण्याच्या राजकारणात शिवसेनेची नवीन वाटचाल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र, सध्याच्या स्थितीत पुण्यातील महायुतीचा 'तिढा' सोडवणे हे मुख्यमंत्र्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.