पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली आहे. जेलेन्स्की यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी जवळपास ३५ मिनिटे फोनद्वारे चर्चा केली. युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या थेट संवादाचे कौतुक केले. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी जेलेन्स्की यांचे आभार मानले. तसेच सुमीमधून भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. पुतीन यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी जवळपास ५० मिनिटे फोनद्वारे चर्चा केली. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. युक्रेनच्या सुमी शहरात ७०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे शहराबाहेर काढणार असल्याचे आश्वासन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे. तसेच पुतीन यांनी जेलेन्स्की यांच्याशी थेट बोलण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना दिले आहे.