राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. बारसूत रिफायनरीला स्थानिकांनी विरोध केला आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तसचं, हे सरकार दहशतवादी मनोवृत्तीचं असून, बारसूमध्ये हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.
कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. हजारो लोकं त्या बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू, गोळ्या खाऊ पण इथून हटणार नाही, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि या राज्याचे उद्योगमंत्री पोलिसांना हाताशी धरुन बारसूच्या आंदोलकांवर ज्याप्रकारे खारघरला सदोष मनुष्य वध केला त्याप्रमाणे त्यांना धमक्या दिल्या जात आहेत इतकंच काय तर बारसूचे जे लोक मुंबईत राहतात आणि त्यांचा विरोध आहे या प्रकल्पाला त्यांच्या मुंबईतील घरात लाथा मारुन पोलीस घुसत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
रिफायनरीच्या आंदोलकांचा विरोध केला जात आहे. हे अतिशय विकृत मनोवृत्तीचं सरकार आहे. दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूच्या माळरानावर जमलेले हजारो लोक जर मागे हटले नाही तर आम्हाला भीती आहे की ते या आंदोलकांवर गोळ्या झाडतील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल, अशी आम्हाला भीती. त्यामुळे उद्धव ठाकरे यात लक्ष घालत आहेत. कदाचित या सर्व प्रकरणावर मुंबईला त्यात लक्ष घालावं लागेल.