Rohini Khadse On Hingoli Incident: ‘त्या बाळाचा मृत्यू म्हणजे एकप्रकारे हत्याच’; हिंगोलीतील धक्कादायक घटनेवर रोहिणी खडसेंचा संताप

हिंगोलीतील जवळा बाजार येथे डिझेल नसल्याने गरोदर महिलेला रुग्णवाहिका मिळाली नाही. वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचता न आल्याने बाळाचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

Rohini Khadse On Hingoli Incident:  ‘त्या बाळाचा मृत्यू म्हणजे एकप्रकारे हत्याच’; हिंगोलीतील धक्कादायक घटनेवर रोहिणी खडसेंचा संताप

जळगाव: हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार परिसरातून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूती वेदना सुरू असलेल्या एका गरोदर महिलेला वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून विरोधकांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी तातडीने १०२ आणि १०८ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांशी संपर्क साधला. मात्र डिझेल उपलब्ध नसल्यामुळे रुग्णवाहिका पाठवता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महिलेला तब्बल अडीच तास प्रतीक्षा करावी लागली.

हेही वाचा: Maratha Reservation: ‘एकतर सरकार झुकेल, नाहीतर माझा जीव जाईल…’; मनोज जरांगेंची 30 मेपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणची घोषणा

वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनली आणि अखेर महिलेला आपले बाळ गमवावे लागले. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्रामीण भागात अजूनही आपत्कालीन सेवा वेळेत मिळत नसल्याचे वास्तव या घटनेमुळे पुन्हा समोर आले आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत राज्य सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा दावा सरकारकडून केला जात असताना प्रत्यक्षात रुग्णवाहिकेसाठी डिझेल नसल्याचे कारण दिले जाते, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde – BJP : शिंदेंना शह! माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबतं; रवींद्र फाटक, क्षितीज ठाकूरनंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात?

रोहिणी खडसे यांनी या घटनेला “व्यवस्थेचे अपयश” संबोधले आहे. “त्या बाळाचा मृत्यू ही केवळ दुर्घटना नसून ही एकप्रकारे हत्या आहे,” असे म्हणत त्यांनी जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. आरोग्य प्रशासन, रुग्णवाहिका कर्मचारी की शासन नेमका दोष कुणाचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून यामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाणार, तसेच संबंधित जबाबदारांवर कोणती पावले उचलली जातील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number