अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.भाजपात प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी मंचावरूनच पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. ‘भाजपाने माझ्यावर विश्वास दाखवला, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पक्ष मला भविष्यात जी जबाबदारी देईल, ती पूर्ण ताकदीने पार पाडेन,’ असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर वरिष्ठ नेत्यांचे विशेष आभार मानले.
राहुरीसह तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आता अधिक गती मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “माझा मतदारसंघ ग्रामीण भागात आहे. येथे वीज, पाणी, शेती आणि विकासाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी आता अधिक चांगलं काम करता येईल,” असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपानेही तनपुरेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढल्याचा दावा केला आहे. राजकीय वर्तुळात आता प्राजक्त तनपुरे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.