हिंगोली: काँग्रेसच्या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या 18 डिसेंबर रोजी त्या अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत गटबाजी आणि दुर्लक्षामुळे त्या नाराज असल्याची चर्चा असून, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
डॉ. प्रज्ञा सातव या सध्या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा असून विधानपरिषदेच्या आमदार आहेत. 2021 मध्ये काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा एकदा विधानपरिषदेवर निवड झाली असून त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. मात्र, अलीकडे पक्षात त्यांना अपेक्षित भूमिका आणि महत्व मिळत नसल्याची भावना त्यांच्या जवळच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घडामोडींवर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिलेला नाही. काँग्रेसने त्यांना आमदारकी दिली असून त्या असा टोकाचा निर्णय घेतील असं वाटत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पक्ष त्यांच्या संपर्कात असून ही चर्चा निराधार असल्याचंही सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दिवंगत राजीव सातव हे काँग्रेसमधील प्रभावी आणि विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जात होते. राहुल गांधी यांचे ते अत्यंत विश्वासातील होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते आणि त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. त्या यशामुळे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंगोलीच्या राजकारणात राजीव सातव हे नाव ताकदीचं समीकरण मानलं जायचं. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि संयमी नेतृत्वामुळे त्यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला होता. मात्र, कोरोनामुळे 2021 मध्ये त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर हिंगोलीसह काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला उतरती कळा लागल्याचं चित्र आहे.
आता प्रज्ञा सातव यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, हा निर्णय प्रत्यक्षात येतो की नाही याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. काँग्रेससाठी हा धक्का ठरेल की भाजपसाठी नवा राजकीय फायदा ठरेल, हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.