दादर स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरुन राजकारण तापलं

मध्य रेल्वे प्रशासनाने दावा केला आहे की हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतपणे बांधण्यात आले आहे. स्थानकाच्या विस्तारासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे मंदिर हटवणे आवश्यक

दादर स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरुन राजकारण तापलं

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूस असलेल्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने बेकायदेशीर बांधकाम घोषित करून हटवण्याची नोटीस दिली आहे. या निर्णयामुळे वाद निर्माण झाला असून मंदिर प्रशासन व भाविकांकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे महाआरती करणार? 
मध्य रेल्वे प्रशासनाने दावा केला आहे की हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतपणे बांधण्यात आले आहे. स्थानकाच्या विस्तारासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे मंदिर हटवणे आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. 5 डिसेंबर रोजी दिलेल्या नोटिशीनुसार, एक आठवड्यात मंदिर हटविण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी 2018 मध्ये देखील अशाच प्रकारची नोटीस देण्यात आली होती.

या प्रकरणावर ठाकरे गटाचे  नेते उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डाव मांडण्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजप हिंदुत्वाच्या नावावर मतं मागते, परंतु बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर भाजप गप्प का आहे? मुंबईतील मंदिर हटवण्यावर भाजप काही बोलत नाही, ही त्यांची नितीमत्ता दाखवते.”

मंदिर प्रशासनाने सांगितले की, 80 वर्षांहून अधिक जुने असलेल्या या मंदिराला अनेक प्रवाशांची आस्था आहे. दादर स्थानकावरून प्रवास करणारे प्रवासी दररोज या मंदिरात माथा टेकून हनुमानजींच्या कृपेने प्रवासाला सुरुवात करतात. मंदिर हटवण्याची नोटीस मिळाल्यावर ट्रस्टने कोणताही तीव्र विरोध नोंदवलेला नाही, मात्र ट्रस्टने स्पष्ट केले की, “हे मंदिर लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे आणि रेल्वेच्या कोणत्याही विकास कामात आम्हाला विरोध नाही, परंतु हे मंदिर हटवण्याने लोकांच्या भावनांना ठेच पोहोचेल.”

मंदिर हटवण्याच्या निर्णयावर काही भाविकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यांच्यामते, हे मंदिर केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. त्यांनी चेतावणी दिली आहे की, “मंदिर हटवण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. हजारो लोकांच्या भावनांना धक्का पोहोचणार आहे, आणि आम्ही ते सहन करणार नाही.”

दरम्यान, आज सायंकाळी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार महेश सावंत यांच्यासह हजारो शिवसैनिक दादरच्या हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी जाणार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंच्या महाआरती आधीच रेल्वेने मंदिराला मिळालेली नोटीस स्थगित केली आहे. आता आदित्य ठाकरे मंदिरात महाआरती करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

दादर स्थानकाबाहेरील हनुमान मंदिराच्या हटवण्यावरून रेल्वे प्रशासन, मंदिर ट्रस्ट, आणि भाविकांसोबत नेत्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. म्हणूनच आता या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे आता या मंदिराला मिळालेल्या नोटिशीला स्थगिती मिळाली मात्र , प्रशासन कसा तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number