बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकारण चांगलचं चर्चेत आलं आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिंदे गट हे मविआच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून एक पोलीस कर्मचारी आमच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थांनी नेत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला.
ठाण्यातील शिंदे गटाचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. याप्रकरणाचा एक व्हिडिओ देखील मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी दाखवला आहे. शिवसेना ठाकरे आणि मनसेकडून करण्यात आलेल्या या आरोपामुळे ठाण्यातील राजकारण तापले आहे. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मनसेतील विक्रांत घाग या उमेदवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी नेत अर्ज मागे घेण्यासाठी दम देण्यात आल्याचा आरोप केला तसेच या उमेदवाराचा मोबाईल बंद आहे.
हेही वाचा- Raj – Udhhav Thackeray: "मोदींनी गंगा आणली, मिंधेंनी समुद्र बांधला" उद्धव – राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी
उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा दिवसाचा तो व्हिडिओ आहे. आम्हाला हा व्हिडिओ तिथं उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून आलेले आहे, आम्ही तिथे थोडी कॅमेरे लावले होते. अद्याप तो उमेदवार आम्हाला भेटलाच नाहीये, तो फोन स्विच ऑफ करून तो गायब आहे. जर त्याला एक पोलिस वाला घेऊन जात असेल तर त्याला धमकवलाच असेल ना? त्याला आत मध्ये घेऊन जाणारा माणूस हा पोलिस ऑफिसर आहे. तो कुठल्या पोलीस स्टेशनला आहे कुठल्या क्राईम ब्रँचला आहे तो तुम्ही शोधा. ज्यांनी ज्यांनी शिवसेना मनसे पक्षाची गद्दारी केली आहे त्यांचा पाहुणचार होणार आहे. ठाण्यातील दोन निवडणूक अधिकारी येत्या दोन दिवसांत बदलले नाही. तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करुन रस्त्यावर उतरू, निर्णय मिळत नाही तो पर्यंत आम्ही थांबणार नाही. ठाण्यातील जे तीन बिनविरोध निवडून आलेत, हे त्या महिलेच्या इथलेच आलेत. तिथले जेवढे अपक्ष उमेदवार होते, त्यांचे फॉर्म का पाठीमागे घेतले गेले? ते फॉर्म का रद्द झाले? त्यांना का अपात्र ठरवण्यात आले. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होऊ शकणार नाही. नवीन आरोची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली.