नवी दिल्ली: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला गुरुवारी संध्याकाळी भारतात आणण्यात आले. राणाला विमानतळावरून थेट पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आले. न्यायालयाने राणाला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2011 मध्ये तहव्वुर राणा यांच्याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
2011 मध्ये, अमेरिकेने राणाला मुंबई हल्ल्यातील सहभागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. परंतु हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला दोषी ठरवले. यावर, तत्कालीन यूपीए सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना पंतप्रधानांनी लिहिले होते की, ‘मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा यांना निर्दोष घोषित करणे हे भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे आणि ते परराष्ट्र धोरणाचे मोठे अपयश आहे.’
हेही वाचा – अखेर तहव्वूर राणाला आणलाच; राणाला दिल्लीत एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज
दोषींना कोणत्या आधारावर निर्दोष घोषित केले –
याशिवाय, पंतप्रधान मोदींनी असा प्रश्न उपस्थित केला होता की, अमेरिकेने मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना कोणत्या आधारावर निर्दोष घोषित केले. मुंबई दहशतवादी घटनेतील पीडितांना न्याय हवा आहे. पंतप्रधानांनी पुढे म्हटलं की, 9/11 च्या गुन्हेगारांचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका भारताला हे करू देईल का? तथापी, मोदींच्या 2011 मधील या पोस्टवर अनेक वापरकर्ते कमेंट करत आहेत. तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल अनेक वापरकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा – विजय मल्ल्याला मोठा झटका! भारतीय बँकांनी दीर्घ लढाईनंतर जिंकली केस; आता ब्रिटनमधील मालमत्ता होणार जप्त
US declaring Tahawwur Rana innocent in Mumbai attack has disgraced the sovereignty of India & it is a “major foreign policy setback” — Narendra Modi (@narendramodi) June 10, 2011
एनआयए करणार राणाची चौकशी –
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच तपास यंत्रणेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की राणा 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहील, या दरम्यान एजन्सी 2008 च्या प्राणघातक हल्ल्यामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी त्याची सविस्तर चौकशी करेल, ज्यामध्ये एकूण 166 लोक मारले गेले होते. तसेच 238 हून अधिक जण जखमी झाले.