Atharva Sudame: सात दिवसांत व्हिडीओ हटवा, अन्यथा… PMPML कडून अथर्व सुदामेला खडेबोल

पीएमपीएमएल बसमध्ये परवानगीशिवाय चित्रीकरण करून महिलांचा अवमान केल्याप्रकरणी सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आली आहे.

Atharva Sudame: सात दिवसांत व्हिडीओ हटवा, अन्यथा… PMPML कडून अथर्व सुदामेला खडेबोल

Atharva Sudame: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमध्ये परवानगीशिवाय चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सोशल मीडियावरील प्रभावक अथर्व सुदामे पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. महिलांचा अवमान करणारे आणि सार्वजनिक संस्थेची प्रतिमा मलीन करणारे चित्रीकरण केल्याचा ठपका ठेवत PMPML प्रशासनाने त्याला नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा आणि संबंधित व्हिडीओ तात्काळ हटवावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

PMPMLच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नोटीसमध्ये, महामंडळाच्या मालकीच्या बस, गणवेश, ई-तिकीट मशीन तसेच अधिकृत बिल्ला यांचा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वापर केल्याचा उल्लेख आहे. या चित्रीकरणामुळे महिला प्रवाशांचा अपमान होत असून त्यांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षिततेला धक्का पोहोचत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक वाहतूक ही सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर चालते. मात्र, अशा प्रकारच्या व्हिडीओमुळे त्या विश्वासाला तडा जात असल्याची चिंता PMPMLने व्यक्त केली आहे.

नोटीसमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या समाजमाध्यमावरील मजकुरामुळे PMPMLची सार्वजनिक प्रतिमा खराब होत असून, महामंडळाच्या व्यावसायिक हितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ वैयक्तिक अभिव्यक्ती म्हणून न पाहता, सार्वजनिक संस्थेच्या नियमांचे उल्लंघन म्हणून पाहिले जात आहे.

अथर्व सुदामे याच्याविरोधात यापूर्वीही वाद निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या काळात एका विशिष्ट समाजाच्या विक्रेत्याकडून गणपतीची मूर्ती खरेदी करण्याच्या आशयावर आधारित चित्रीकरण समाजमाध्यमावर टाकण्यात आले होते. त्या व्हिडीओमुळे दोन समाजांमधील भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मोठा वाद झाल्यानंतर, कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता असे सांगत अथर्वने संबंधित व्हिडीओ हटवून माफी मागितली होती.

दरम्यान, PMPML प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, महामंडळाच्या परिसरात किंवा मालमत्तेशी संबंधित ठिकाणी कोणतेही चित्रीकरण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही परवानगी न घेता व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे कृत्य PMPMLच्या धोरणांच्या थेट विरोधात असून, भविष्यात अशा प्रकारांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करून समाजमाध्यमावरील संबंधित चित्रीकरण हटवले नाही, तर प्रचलित कायदे आणि नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे PMPMLने स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करताना नियमांचे पालन किती आवश्यक आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number