नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने सोशल मीडियावर ॲक्टिव्ह पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी असे आश्वासन दिले होते की, पेपरफुटी सारखा गुन्हा करणाऱ्यांवर फार्स्ट ट्रॅकवर कारवाई व्हावी म्हणून संसदेत विधेयक मांडणार. अखेर त्यासंबंधीत आणखी एक व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी देशातील परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. ‘संसदेने अलिकडेच असा कायदा मंजूर केला आहे, जो देशातील परीक्षा व्यवस्था अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’ म्हणत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
टास्क फोर्स आणि राज्यांच्या सूचनांवर भर
’विश्वासार्ह परीक्षा पद्धती निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने एकामागोमाग एक पावले उचलत आहोत. टास्क फोर्सची स्थापना, फास्ट ट्रॅक यंत्रणेची उभारणी आणि राज्यांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यात येत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून देशातील विविध राज्ये आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
या गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून देशभरातील परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम करत परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
परीक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक सुधारणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितले की, परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करणे आता काळाची गरज बनली आहे. पेपर माफिया आणि पेपरफुटी करणाऱ्या टोळ्या देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. अशा कोणत्याही रॅकेटला सरकार अजिबात सोडणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि परीक्षा व्यवस्थेला भ्रष्ट करणाऱ्या प्रत्येक घटकावर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर पावले उचलली जातील, असेही पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले.
पेपर माफियांना कोणतीही सूट मिळणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर कायद्यांचीही आवश्यकता आहे. यासाठी आम्ही संसदेत विधेयक मांडले होते आणि मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार आज संसदेच्या दोन्ही सभागृहांनी कठोर तरतुदी असलेले हे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे विश्वासार्ह आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, सुधारणा करण्याचे काम यापुढेही सातत्याने सुरू राहील.’