नवी दिल्ली | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तरुण व शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या योजनांची घोषणा करणार आहेत. या योजनांचा एकूण खर्च 62 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. सरकारच्या मते, या उपक्रमांमुळे देशातील तरुण पिढीला थेट लाभ होणार आहे.
पीएम-सेतू या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तब्बल 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशभरातील 1,000 शासकीय आयटीआय महाविद्यालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 200 महाविद्यालये प्रमुख "हब" म्हणून विकसित केली जातील, तर उर्वरित 800 त्यांच्याशी संलग्न असतील. डिजिटल लर्निंग, इनोव्हेशन सेंटर, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि प्लेसमेंट सेवा यामुळे विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधी मिळतील.
शालेय स्तरावरदेखील कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. देशभरातील 400 नवोदय विद्यालये आणि 200 एकलव्य मॉडेल शाळांमध्ये एकूण 1200 स्किल लॅब्स सुरू केल्या जातील. या लॅब्समधून माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, शेती, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक्स आणि पर्यटनासह 12 प्रमुख क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हेही वाचा : India EFTA Free Trade Agreement 2025: युरोपमधील 4 देशांसोबत मोठा करार, भारतात तब्बल 9 लाख कोटींची गुंतवणूक; 'या' वस्तूंच्या किंमती होणार कमी
याशिवाय, पंतप्रधान मोदी एनआयटी पटना (बिहटा कॅम्पस) देशाला समर्पित करणार आहेत. या कॅम्पसमध्ये 6500 विद्यार्थ्यांसाठी जागा असून 5G प्रयोगशाळा, अवकाश संशोधन केंद्र आणि इनोव्हेशन हबची सुविधा आहे. या केंद्राने आतापर्यंत नऊ स्टार्टअप्सना मदत केल्याची माहिती देण्यात आली आहे.
बिहारसाठी खास योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यात निश्चय स्वयं सहाय्य भत्ता योजनेअंतर्गत दरवर्षी पाच लाख पदवीधर तरुणांना दरमहा 1000 रुपयांचे मानधन व मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेच्या नव्या रूपातून चार लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज उपलब्ध होईल. बिहार युवा आयोग स्थापन करण्याबरोबरच जननायक कर्पूरी ठाकुर स्किल विद्यापीठ सुरू होणार आहे, जे उद्योगाधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल.
या सर्व योजनांमुळे शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. विशेषत: बिहारसह देशातील लाखो तरुणांना या उपक्रमांमुळे थेट फायदा होईल, असे मानले जात आहे.