नवी दिल्ली: जागतिक घडामोडींमुळे इंधन बाजारात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्त्वाचा जलमार्ग पुन्हा खुला झाल्याच्या बातम्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेल दरांवर दिसू लागला आहे.
आज बुधवारी, दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 15 डॉलरपेक्षा अधिक घसरण झाली आणि दर पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले. ब्रेंट क्रूड सुमारे 95 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले, तर वेस्ट टेकसास क्रूडही 97 डॉलरच्या आसपास पोहोचले. ही जवळपास 14 टक्क्यांची मोठी घसरण मानली जात आहे.
या घसरणीचा परिणाम देशातील इंधन दरांवरही दिसून आला. अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. गुरुग्राममध्ये पेट्रोल 95.51 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 87.97 रुपये प्रति लिटरवर आले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 94.41 रुपये आणि डिझेल 87.47 रुपये प्रति लिटर झाले आहे. बिहारची राजधानी पटना येथे पेट्रोल 105.48 रुपये, तर डिझेल 91.72 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.
देशातील चार प्रमुख महानगरांमध्येही दर स्थिरतेकडे झुकताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 94.72 रुपये आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 103.44 रुपये, डिझेल 89.97 रुपये, चेन्नईत पेट्रोल 100.76 रुपये आणि डिझेल 92.35 रुपये, तर कोलकात्यात पेट्रोल 104.95 रुपये आणि डिझेल 91.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
विशेष म्हणजे, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही घसरण गेल्या काही दिवसांतील तणावपूर्ण परिस्थितीनंतर दिलासादायक मानली जात आहे. ऊर्जा बाजारात निर्माण झालेली अनिश्चितता कमी झाल्याने पुरवठा साखळी स्थिर होण्याची शक्यता आहे.
एकूणच, जागतिक राजकीय घडामोडींचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर बदलत राहण्याची शक्यता आहे.