देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांहून अधिक वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण आणखी वाढणार आहे. आधीच सीएनजी, गॅस सिलिंडर, दूध, सोने-चांदी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असताना आता इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि रोजच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
शुक्रवार सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू करण्यात आले. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 3 रुपये 14 पैशांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ जाहीर केली. यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर पुन्हा उच्चांकाकडे गेले आहेत.
नवीन दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोल 97.77 रुपये प्रति लिटर झाले असून मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 108.74 रुपये तर चेन्नईत 103.67 रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली असून मुंबईत डिझेल 93.14 रुपये प्रति लिटरवर गेले आहे.
तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियामध्ये वाढत असलेला तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला आहे. याच कारणामुळे तेल कंपन्यांना दरवाढ करावी लागल्याचे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे सराफा बाजारातही दर वाढले आहेत. सीएनजीच्या किमतीत दोन रुपयांची वाढ झाली असून घरगुती गॅस सिलिंडर, दूध आणि इतर वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे मासिक बजेट पूर्णपणे बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंधन दरवाढीचा सर्वात मोठा परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. डिझेल महागल्याने मालवाहतुकीचा खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम थेट भाजीपाला, किराणा आणि इतर वस्तूंच्या किमतींवर दिसून येईल. रोज दुचाकी किंवा चारचाकीने प्रवास करणाऱ्या नोकरदारांनाही महिन्याच्या खर्चाचा नव्याने हिशोब करावा लागणार आहे.
छोटे व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक आणि वितरण व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही या वाढत्या इंधन दरांचा मोठा फटका बसणार आहे. आगामी काही दिवसांत पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी गंभीर झाली तर इंधन दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांचे उत्पन्न मात्र स्थिर असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे आता सरकारकडून काही दिलासादायक उपाययोजना जाहीर होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.