२० जुलै, २०२४ अहमदनगर : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याची पहिलीच सुनावणी ही २५ जुलै रोजी होणार आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर नावाची घोषणा केली होती. त्यानंतर, अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकांनी देखील तसा ठराव पाठवला होता. त्यामुळे, राज्यसरकारने मंत्रिमंडळात अहिल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. सध्या हे प्रकरण केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, राज्यसरकारच्या या निर्णयाविरोधात आता जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने याबाबत न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.