पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले होते. या प्रचारादरम्यान भाजप नेते महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र या टीकेनंतर आता महेश लांडगे यांना त्यांच्या वक्तव्याचा पश्चात्ताप झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर काल महेश लांडगे यांनी एका जाहीर सभेत स्टेजवरून “दादा, मला माफ करा,” असे शब्द उच्चारत सार्वजनिकरीत्या माफी मागितली आणि अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे उपस्थितांमध्येही संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सीमा सावळे यांनी महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “सत्तेची नशा चढली की माणूस असा वागतो,” असे म्हणत त्यांनी लांडगेंच्या भूमिकेवर घणाघाती शब्दांत प्रहार केला. प्रचाराच्या काळात वापरलेल्या भाषेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सीमा सावळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा विकास अजित पवार यांनीच केला आहे. “या शहराचा विकास अजितदादांनी केला आहे. तुम्ही आज जे काही आहात, तेही अजितदादांमुळेच,” असे सांगत त्यांनी थेट महेश लांडगे यांना समोरासमोर सुनावले.
राजकारण करताना शब्द जपून वापरणे किती महत्त्वाचे असते, याची आठवण करून देताना सावळे म्हणाल्या, “ज्या वेळी तुमचे शब्द सभास्थळातून बाहेर पडत होते, त्या वेळी आम्हाला प्रचंड दुःख होत होते. केवळ आम्हालाच नाही, तर अनेक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना ते खूप वाईट वाटत होते.”
आपल्या टीकेचा शेवट करताना सीमा सावळे यांनी पुन्हा एकदा सत्तेच्या अतिरेकावर बोट ठेवले. “सत्तेची नशा चढली की अशा गोष्टी घडतात,” असे म्हणत त्यांनी महेश लांडगे यांच्या वागणुकीवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केला. या वादामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.