नाशिक, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. अजित पवार आजही आमचेच नेते आहेत, असे शरद पवार म्हणाले, पवारांच्या या वक्तव्याचे शिंदे सरकारचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले. शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करत आहोत. भुजबळ,मुंडे आणि इतर नेते तुमचे कार्यकर्ते आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. साहेब आमचेच आहेत म्हणून त्यांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलो आहोत, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. पक्षात फूट पडलेली नाही. शरद पवार यांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे असे छगन भुजबळ म्हणाले.
याआधी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अजित पवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण अजित पवार यांनी मागील काही दिवसांत केलेल्या कृतीबाबत विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केले. पक्षात फूट पडलेली नाही मग अजित पवारांविरोधात विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार का केली आहे, या प्रश्नाचे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले नाही. राष्ट्रवादीत फूट पडली नाही तर प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची प्रक्रिया का राबवली जात आहे, यावर पक्षात अनेक गोष्टी दैनंदिन कामाचा भाग म्हणून सुरू आहेत असे मोघम उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. यानंतर पवारांनी सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य योग्यच असल्याचे सांगितले. वेगळा निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायची गरज नाही, असेही शरद पवार म्हणाले.