Parbhani Election Result: परभणीत ठाकरेंचा ‘गनिमी कावा’; भाजप-शिंदेंची लाट रोखण्यात शिवसेनाच्या या शिलेदाराला यश

आमदार राहुल पाटील यांनी या विजयाला जनतेच्या निष्ठेची पोचपावती असल्याचे म्हटले असून, परभणीत पहिल्यांदाच ठाकरेंचा महापौर विराजमान होणार आहे.

Parbhani Election Result: परभणीत ठाकरेंचा ‘गनिमी कावा’; भाजप-शिंदेंची लाट रोखण्यात शिवसेनाच्या या शिलेदाराला यश

परभणी: संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची सुसाट लाट असताना, मराठवाड्याच्या मातीत मात्र उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी आपला गड अभेद्य राखला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 25 जागांवर दिमाखदार विजय मिळवत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. “हा विजय म्हणजे गेल्या 10 वर्षांत आम्ही केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती आहे,” अशा शब्दांत विजयाचे शिल्पकार आमदार राहुल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पैशांचा पाऊस तरीही गाठले लक्ष 

विजयाचा गुलाल उधळत असतानाच राहुल पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “आम्ही 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या तयारीत होतो, पण शेवटच्या 2 दिवसांत पैशांचा अलोट वापर झाला. लक्ष्मीदर्शनामुळे आमचा आकडा थोडा कमी झाला असला, तरी परभणीच्या जनतेने निष्ठेलाच कौल दिला आहे.” प्रभाग क्रमांक 15 मधील दोन जागांसह प्रभाग 1 आणि 9 मध्येही ठाकरेंच्या शिवसेनेने भगवा फडकवला असून, आता काँग्रेसच्या साथीने महापालिकेवर ‘शिवसैनिक’ महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: Raj Thackeray On BMC Election Result 2026 : निवडणूक सोपी नव्हती, धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती… राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट

कार्यकर्त्यांचं जाळं अन् जनतेचा विश्वास

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा परभणीत फारसा प्रभाव पडला नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. “नेते प्रचाराला येतातच, पण संकटकाळी धावून जातो तो जमिनीवरचा कार्यकर्ता. मग तो दवाखाना असो वा पोलीस स्टेशन, आमचा शिवसैनिक सदैव तत्पर असतो. हेच कार्यकर्त्यांचे घट्ट जाळं आणि समांतर पाणीपुरवठा योजनेसारखी विकासकामे आज आमच्या विजयाचा आधार ठरली आहेत,” असे त्यांनी नमूद केले. सर्वधर्मीय मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हा विजय सुकर झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

विकासाची गंगा आता परभणीच्या दारी

निकालांनंतर आता परभणीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प राहुल पाटील यांनी सोडला आहे. शहर चहूबाजूंनी विस्तारत असताना नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर असणार आहे. “मी आमदार म्हणून विधिमंडळात आवाज उठवेन आणि आमचे खासदार संसदेत खिंड लढवतील. आम्ही सक्षम आहोत, विकासाचा निधी खेचून आणू आणि परभणीचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतिहास घडणार! पहिल्यांदाच ठाकरेंचा महापौर

परभणी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. ही बाब शिवसैनिकांसाठी अत्यंत अभिमानाची असून, “एका सर्वसामान्य घरातील शिवसैनिक महापौर पदावर बसताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे पाटील म्हणाले. देशात आणि राज्यात भाजपची लाट असताना परभणीकरांनी दिलेला हा ‘न्याय’ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला असून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत या विजयाची गुंज ऐकू येत आहे.

हेही वाचा: Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी गुड न्यूज; नेमकं कुठे होणार नवीन स्टेशन? पाहा प्रवाशांना मिळणाऱ्या 'या' आधुनिक सुविधा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number