खंडणीप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाले. मुंबईतील कांदवलीमधील गुन्हे शाखेत खंडणी वसुली प्रकरणाची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी खुलासा केला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे. तसेच परमबीर सिंह यांच्या निलंबनासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. परमबीर सिहं यांची कायदेशीर बाजू पाहूनच त्यांच्याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच महिन्यांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. त्यामुळे ‘मी भारतातच असून माझ्या जिवाला धोका असल्या’चे वक्तव्य परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. यावर गृहमंत्री म्हणाले, ‘परमबीर सिंह यांना मुंबईत धोका वाटत असल्याचे ऐकून धक्का बसला.’ परमबीर सिंह यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी काम केले आहे. त्यामुळे इतके महत्त्वाचे पद भूषवलेल्या व्यक्तीला मुंबईत जीवाला धोका वाटत आहे, त्यामुळे हे जाणून धक्का बसला असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.