पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधी वर्षा भीमराव साठे यांचे पाय धुतल्याचा प्रकार समोर आला आहे. सुखसागर नगर येथील महापालिका शाळेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात चर्चा रंगली असून या प्रकारावरून राजकीय वातावरणही तापले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचे पाय धुतल्याचे समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी तीव्र निषेध केला आहे. अमोल परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, शाळा या शिक्षण, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची ठिकाणे आहेत, व्यक्तिपूजेची नव्हेत. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, पेन आणि संविधान असावे, कोणत्याही लोकप्रतिनिधीची किंवा व्यक्तीची पूजा करण्याची वेळ येऊ नये.
अशा प्रकारच्या घटना संविधानिक मूल्यांच्या विरोधात असून शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणीही अमोल परदेशी यांनी केली आहे.