सोलापूर, ०९ जून, २०२३, प्रतिनिधी :
“आषाढी यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी चालत येत असतात, अशावेळी मानाच्या आणि परंपरांच्या वारकरी दिंड्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे.” “यामुळे कष्टकरी शेतकरी आणि गरीब असणारा वारकरी मोफत पंढरपूरपर्यंत येऊ शकेल. वारकरी दिंड्यांना अनुदान जर दिले नाही तर वेळप्रसंगी वारकरी संघटना वारी दिंड्या पालख्या थांबवून आंदोलन करतील.”, असा इशारा वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी दिला आहे. दिंडी अनुदानाची मागणी आता जोर धरू लागली आहे. विठ्ठल पाटलांच्या या दिंडी अनुदानाच्या मागणीबाबत वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी आणि वारकऱ्यांमधून स्वागत होताना दिसत आहे.