शिवसेना उद्धव ठाकरे गटविरोधात ‘ऑपरेशन टायगर’ राबवत शिंदे गटाने मोठी राजकीय हालचाल केल्याची चर्चा सुरू झाली. या कारवाईत तब्बल 6 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी 5 खासदारांच्या ठावठिकाण्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या 5 खासदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांना राजस्थानमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा होती. दरम्यान, या घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांचेही नाव घेतले जात असले तरी, ते या घडामोडींमध्ये सहभागी नसून ते पुण्यातच होते, असे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतील न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते पुणे ते मुंबई असा प्रवास करत असल्याचेही सांगितले जाते.
याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील काही खासदारांनी बंड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. मात्र हे खासदार नेमके कुठे आहेत, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील कथित बंडखोर खासदारांचा पहिला फोटो समोर आल्याने या प्रकरणाला आणखी वेग आला आहे.
संपूर्ण प्रकरणावर सध्या विविध दावे आणि प्रतिदावे सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे खासदार, संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे दिसत आहेत. हे 3 खासदार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे फोटोवरून दिसून येत आहे. मात्र, हे खासदार नक्की कुठे थांबले आहेत, हे स्पष्ट होऊ शकत नाही.