राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर 3’ची चर्चा रंगू लागली आहे. वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील 20 आमदारांपैकी तब्बल 14 आमदारांनी अलीकडेच एका अज्ञात स्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता आमदारांच्या संभाव्य हालचालींबाबतच्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल विधिमंडळातील काही कामकाजावेळी अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमागे याच राजकीय घडामोडी कारणीभूत असल्याचा दावा काही सूत्रांकडून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. या सर्व घडामोडींमुळे आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित आमदार आणि पक्ष नेतृत्वाची भूमिका काय असेल याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.