Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पिढीबदलाबाबत एक अत्यंत सूचक आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नागपूर येथे आयोजित ‘ॲडव्हान्टेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवा’च्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखादी व्यवस्था किंवा काम सुरळीत सुरू होते, तेव्हा जुन्या पिढीने तरुण रक्तासाठी जागा सोडली पाहिजे. तरुणांना जबाबदारी देण्याची वेळ आली असून, जुन्या पिढीने हळूहळू मार्गदर्शक म्हणून मागे हटत इतर विधायक कामांकडे वळावे, असा सल्ला त्यांनी दिला.
6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ महोत्सव
विदर्भाला भारताच्या औद्योगिक नकाशावर एक प्रबळ केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, हा महोत्सव 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात रंगणार आहे. या उपक्रमाचे मुख्य संरक्षक असलेल्या गडकरींनी माहिती दिली की, विदर्भाच्या विकासासाठी यंदा तिसऱ्यांदा हा महोत्सव आयोजित केला जात असून, यात स्थानिक उद्योजकांच्या कौशल्याचे दर्शन घडणार आहे.
आशिष काळे यांचे दिले उदाहरण
पिढीबदलाच्या मुद्द्यावर बोलताना गडकरींनी महोत्सवाचे आयोजक आशिष काळे आणि त्यांच्या वडिलांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, ‘आशिषचे वडील माझे जुने मित्र आहेत. मात्र, आता आशिषने या उपक्रमात तरुण पिढीला ज्या प्रकारे सहभागी करून घेतले आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की, पिढ्यांमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एकदा परिस्थिती नियंत्रणात आली आणि काम नीट सुरू झाले की, आपण निवृत्त होऊन नवी जबाबदारी नवीन पिढीकडे सोपवून काहीतरी वेगळे केले पाहिजे.’
हेही वाचा – Mumbai Mayor : मुंबईवर महायुतीची मोहोर? पंतप्रधान मोदींनी मुंबई महापौर निवडीबाबत थेट दिले संकेत
सर्वांगीण विकासासाठी ‘थ्री-सेक्टर’ मॉडेलवर भर
कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीसाठी केवळ उद्योग पुरेसे नसून कृषी आणि सेवा क्षेत्राची जोड असणे आवश्यक असल्याचे गडकरींनी अधोरेखित केले. या एक्स्पोमध्ये कापड, खनिजे, संरक्षण, आयटी, लॉजिस्टिक्स आणि स्टार्टअप्स यांसारख्या विविध क्षेत्रांतील उद्योगांचा सहभाग असणार आहे. विशेषतः अक्षय ऊर्जा आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांवर या महोत्सवात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.