आगामी १५ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी कोणत्या आधारावर असं वक्तव्यं केलं हे माहित नसल्याचं अजित पवार म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांना राऊतांनी केलेल्या दाव्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले, संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. नागपूरनंतर संजय राऊतांसोबत माझी भेट झालेली नाही. त्यांना ही माहिती कुठे मिळाली मला माहित नाही. त्यामुळे राऊतांनी कोणत्या आधारे हे वक्तव्य केलं हे कसं सांगणार?, असे अजित पवार म्हणाले. तसेच, भाजपाच्या नेत्यांच्या मनात काय आहे याच्याशी माझा काय संबंध. पत्रकारांना दांडके दिले तर तुम्ही काहीही बोलत असता, असे म्हणत अजित पवार पत्रकारांवर चिडले.
अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, कुणी मला जर चांगले म्हणत असेल तर तुमच्या का पोटात दुखतं?. प्रत्येकाने चांगले काम करावे जेणेकरून लोकांनी त्याला चांगलं म्हणावं. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले.