आज राष्ट्रवादी पक्षाचा 27 वा वर्धापन दिन मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. वर्धापन दिनाच्या या सोहळ्यात शरद पवार गटाच्या यंग ब्रिगेडने घणाघाती भाषणं केली. यावेळी सुनील गव्हाणे, मेहबुब शेख, सक्षणा सलगर या युवा नेत्यांनी आक्रमक भाषणं करत व्यासपीठ गाजवले. यावेळी शरद पवार यांनी नेहरूंच कौतुक करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, “आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम. मला मोठी गंमत वाटली. पक्षाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी टाइम्समध्ये राष्ट्रवादीची जाहिरात पाहिली नव्हती. कारण त्याची किंमत काय असते ते पाहिलं आणि त्या रस्त्याने कधी गेली नाही. यावेळी ती जाहिरात बघायला मिळाली. तुमची उपस्थिती बघितल्यानंतर ही जाहिरात सिमित नाही. त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. आज वर्धापन दिन आहे. सत्ता असो नसो, त्याची चिंता तुम्ही कधी केली नाही. अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात दिला. आपण सत्ता असली की सत्तेत काम करतो. नसेल तर लोकांमध्ये काम करतो.”
“प्रश्न खूप आहेत. देशाचे शेतकरी, सुशिक्षित बेकार, आदिवासी, महिला, अल्पसंख्या या घटकांच्या समस्या देशात आहे. ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांना या सगळ्यांबद्दल किती आस्था आहे, ते दिसून येत आहे. चिंता एका गोष्टीची आहे की, काही लोक काही दिवस सतत हे प्रयत्न करत आहेत की या देशात असा एखादा नेता झालाच नाही. या देशात नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. पंतप्रधान हे पद संस्थात्मक पद आहे, त्याची प्रतिष्ठा ठेवणे आपले काम आहे. धोरणात्मक पदाचा अनादर कधी होत नाही. पण गंमत वाटते, आज दोन गोष्टी पाहण्यात आल्या. एकावेळेस त्यांनी आजच्या नेतृत्वाची तुलना जवाहरलाल नेहरूंशी केली. ठिक आहे. तुम्ही पंतप्रधान झाला. त्यांना इतकी वर्ष मिळाली. त्याचं महत्त्वं आहे. पण नेहरू जेवढे पंतप्रधान होते तेवढं कोणी होऊ शकत नाही.”