T20 World Cup: पाच पराभवांचा हिशोब एकाच विजयात केला चुकता; इडन गार्डन्सवर ‘फिन ऍलन’ नावाचं वादळ, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक

टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

T20 World Cup: पाच पराभवांचा हिशोब एकाच विजयात केला चुकता; इडन गार्डन्सवर ‘फिन ऍलन’ नावाचं वादळ, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक

कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर बुधवारी क्रिकेटचा एक नवा आणि थरारक अध्याय लिहिला गेला. आयसीसी टी-२० विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला अक्षरशः आस्मान दाखवत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे.

साखळी आणि 'सुपर-8' फेरीत अजिंक्य राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न अवघ्या एका पराभवाने धुळीस मिळवलं. विशेष म्हणजे, याआधीच्या विश्वचषकातील सलग पाच पराभवांचा सव्याज वचपा काढत किवी संघाने नऊ विकेट्स राखून मिळवलेला हा विजय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरला जाईल.

नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरच्या बाजूने लागला आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सँटनरचा हा निर्णय किवी गोलंदाजांनी सार्थ ठरवला आणि आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. तरीही, तळाच्या फळीतील मार्को यान्सेनच्या नाबाद 55 धावांच्या झुंजार खेळीमुळे आफ्रिकेला सन्मानजनक मजल मारता आली. त्याला डेवाल्ड ब्रेव्हिस (34) आणि ट्रिस्टन स्टब्स (29) यांनी दिलेली साथ महत्त्वाची ठरली. निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 169 धावांपर्यंत मजल मारत आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 170 धावांचं आव्हान उभं केलं होतं.

हेही वाचा: Today's Horoscope 2026 : नक्षत्रांनुसार या राशीसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील; वाचा आजचे राशिभविष्य

दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर 170 धावांचं आव्हान कठीण वाटेल, असा अंदाज बहुतेकांनी बांधला होता. पण, न्यूझीलंडच्या सलामीवीरांच्या मनात काही वेगळंच होतं. फिन ऍलन आणि टीम सायफर्ट या जोडीने मैदानात पाऊल ठेवताच आफ्रिकन गोलंदाजांवर निर्दयी प्रतिहल्ला चढवला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 9.1 षटकांत 117 धावांची वादळी शतकी भागीदारी करत सामन्याचा निकाल एका झटक्यात स्पष्ट केला. टीम सायफर्टला 58 धावांवर त्रिफळाचीत करत कगिसो रबाडाने ही जोडी फोडली, पण तोपर्यंत आफ्रिकेच्या हातून सामना पूर्णपणे निसटला होता.

सायफर्ट बाद झाल्यानंतरही 'फिन ऍलन' नावाचं वादळ शमलं नाही. त्याने रचीन रवींद्रच्या (नाबाद 13) साथीने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेणं सुरूच ठेवलं. ऍलनच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटका थेट सीमारेषेबाहेर जात होता. त्याने केवळ 33 चेंडूंत 8 गगनभेदी षटकार आणि 10 खणखणीत चौकारांची आतषबाजी करत नाबाद शतक ठोकलं. दिमाखदार चौकार ठोकतच त्याने शतक आणि संघाचा विजय एकाच वेळी साजरा केला. न्यूझीलंडने हे आव्हान तब्बल 43 चेंडू राखून, म्हणजे अवघ्या 12.5 षटकांत केवळ एक विकेट गमावून सहज पूर्ण केलं.

या एकतर्फी विजयासह न्यूझीलंडने विश्वचषकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलं आहे. टी-20 विश्वचषकात याआधी आफ्रिकेकडून पत्कराव्या लागलेल्या पाचही पराभवांची व्याजासह परतफेड किवींनी एकाच सामन्यात केली. 8 मार्च रोजी रविवारी रंगणाऱ्या या महाअंतिम थरारात न्यूझीलंडसमोर कोण उभं ठाकणार, याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा: SA vs NZ : पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचे न्यूझीलंडसमोर 170 धावांचे लक्ष्य; मार्को जॅनसेनने झळकावलं अर्धशतक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number