लोकसभेत कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केले. त्यानुसार आता विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, १९५० आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१मध्ये बदल करण्यात येणार आहे.
निवडणूक सुधारणांच्या दिशेने लोकप्रतिनिधी कायदा, १९५० आणि १९५१ या कायद्यांत बदल करणे महत्त्वाचे मानले जात आहे. कायद्यांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये मोठा बदल हा मतदार ओळखपत्राबाबत करण्यात येणार आहे. आता लवकरच मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याचे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. तसेच मतदार यादीही आधारकार्डशी लिंक करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
लोकसभेत सादर करण्यात आलेल्या निवडणूक सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेले माहितीनुसार, केंद्राने निवडणुक सुधारणा विधेयकामध्ये बदल केले आहे. यामध्ये मतदार ओळखपत्र आणि आधारक्रमांक लिंक करण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. तसेच नवीन मतदास म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळेस संधी देण्यात येणार आहे.