केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यासाठी नारायण राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र नारायण राणे चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट नारायण राणे यांच्या घरावर नोटीस चिटकवली. नोटीस चिकटवताना खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून व्हिडीओग्राफी करण्यात आली असून याचा पंचनामा करण्यात आला आहे.
२८ डिसेंबर रोजी आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याबद्दल पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आपण ‘नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहेत का?’ असे विधान केले. या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या होत्या. नितेश राणे यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करता असे दिसते की, नितेश राणे यांचा ठावठिकाणा आपल्याला पूर्णपणे माहित आहे. तरी सदरील नोटीस मिळताच आपण नितेश राणे यांना न्यायालयासमोर हजर करावे. तसेच आपल्या पत्रकार परिषदेनुसार आपल्याला माहित असलेल्या गुन्ह्याच्या तपशिलाबाबत जबाब नोंदवण्यासाठी २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता कणकवली पोलिस ठाण्यात स्वत: हदर रहावे असा मजकूर असलेली ही नोटीस कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांच्या घरावर चिकटवली आहे.